Text selection Lock by Hindi Blog Tips

Flag counter

free counters

Saturday, August 11, 2007

वापरा जरा आम्हाला समजेल अशी भाषा.

वापरा जरा आम्हाला समजेल अशी भाषा.
----------------------------------------

श्वास घ्यायला सुद्धा लागतोय इथं पैसा
कसे करणार कर्म सोडुन फळाचि आशा ?
नुसते पोकळ शब्द, बुडतील का मनात ?
वापरा जरा आम्हाला समजेल अशी भाषा.

भरल्या पोटी ढेकर देत,
मिताहारावर बोलताय ?
सत्त्याग्रहातले मीठ,
जखमेवर चोळताय ?

दांडी आता उडाली, सत्त्याने गुंडाळलाय गाशा.
वापरा जरा आम्हाला समजेल अशी भाषा.

पैशाच्या पुंगीमुळेच तर,
नाग गुंगुन डोलतायत.
सोनेरी पिंजर्यातले पोपट,
तत्वज्ञान बोलतायत !

चुकली आहे कुणाला, धनाचि अभिलाषा ?
वापरा जरा आम्हाला समजेल अशी भाषा.

भंकस डोस पाजण्यापेक्षा,
पोटाला काही घाला.
भाकड विचारांच्या दांडुने,
बडवावं कशाला ढोलाला ?

भेगाळलेल्या कातडीचा, नका बनऊ ताशा.
वापरा जरा आम्हाला समजेल अशी भाषा.

नश्वरतेचे सत्य समजुन,
काय होणार फायदा ?
नको आम्हाला तुमचा,
मुक्ती-बिक्तीचा वायदा.

पोटात मेल्या कावळ्यांवर, घोंगावताहेत माशा
वापरा जरा आम्हाला समजेल अशी भाषा

'दाम करी काम' हे,
यमक किती जुळतंय !
दुसरं काही जुळवलं तरी,
कानाला सालं खटकतंय !

किर्तनाचे दिवस गेले, उरलाय फक्त तमाशा
वापरा जरा आम्हाला समजेल अशी भाषा

No comments: